दहा दिवसांची पाळत, अखेर आरोपीचा माग सापडला
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनांचा सखोल अभ्यास करत गोपनीय तपास सुरू केला. दहा दिवस आरोपीच्या हालचालींवर पाळत ठेवल्यानंतर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील अब्बास युनिस सय्यद ऊर्फ ‘बड्डा’ (वय 21) याला अटक करण्यात आली. तो रेल्वेने मुंबई व ठाणे परिसरात येऊन गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
advertisement
Mumbai News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, ‘टॅटू’मुळे गंडला डाव, पोलिसांनी कसं पकडलं?
30 लाखांचे दागिने जप्त; 20 गुन्ह्यांचा उलगडा
आरोपीकडून सुमारे 30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून ठाणे, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, चितळसर आणि वर्तकनगर या भागांतील तब्बल 20 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बड्डा वयोवृद्ध महिला, बेसावध पुरुष तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत असे. संधी साधून तो गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून चोरायचा आणि क्षणात पसार होत असे. हीच पद्धत वापरून त्याने अनेक ठिकाणी चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
कल्याणमध्ये वास्तव्य, बीदरशी थेट कनेक्शन
आरोपी कल्याणच्या अंबिवली परिसरात राहत होता. तसेच तो बीदरमधील इराणी वस्तीचा घरजावई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही ठिकाणांचा तो सुरक्षित आसऱ्यासाठी वापर करत होता. चोरीसाठी तो प्रामुख्याने रेल्वेचा वापर करत असे. संशय टाळण्यासाठी अनेकदा तो बीदरच्या आधीच किंवा कल्याणमध्ये उतरण्याआधी वेगळ्याच स्थानकावर उतरून चोरी करत असे. चोरीनंतर तो पुन्हा कर्नाटकात पसार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक रवींद्र पाटील, हवालदार वसंत चौरे, प्रशांत राणे, विजय कुंभार आणि अमोल इंगळे यांच्या पथकाने आरोपीचा माग काढून त्याला जेरबंद केले. सध्या आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून, त्याचे इतर साथीदार आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या अटकेमुळे सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






