या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सव संपला होता. त्यावेळी, 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचं नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यानंतर कांदिवलीतील या दोन्ही मंडळांनी त्यांच्या 12 फूट उंचीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यास नकार दिला होता.
"आम्ही शनिवारी दुपारी तीन ढोल ताशा पथकांच्या गजरात एक भव्य मिरवणूक काढू आणि मार्वे बीचकडे जाऊ," असं 'कांदिवलीचा श्री' या मंडळाचे खजिनदार सागर बामनोलीकर म्हणाले. विशेष म्हणजे, लहान पीओपी मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्याच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन देखील केलं. ते म्हणाले की, सुमारे दोन लाख घरगुती गणेश मूर्ती असतात. त्यांचे समुद्रात विसर्जन झाले नाही तर पर्यावरण प्रदूषण कमी होईल.
advertisement
'चारकोपचा राजा' हे मंडळ 2 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करणार आहे, अशी माहिती आयोजक निखिल गुढेकर यांनी दिली. या मंडळातील गणेश मूर्तीचे डहानुकरवाडी तलावात विसर्जन होईल.
दरम्यान, भाद्रपद गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांच्या समन्वय मंडळाने, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना आयोजकांसोबत वार्षिक बैठक घेण्याची विनंती केली आहे.
29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण मोर्चा बोलावला आहे. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी, प्रशासनाला सतर्क केलं आहे. कारण, 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. अशातच हा मोर्चा मुंबईत आला तर वाहतूक यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
