मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचलं आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला तळ्याचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मात्र आता सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सुरू असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुट्टीची घोषणा केली.
advertisement
दरम्यान दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. यंदा पहिल्यांदाच पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. नदीची पाणीपातळी 31 फुटांपर्यंत पोहोचली आहे. 50 बंधारे पाण्याखाली गेल्याने बांधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 3 ग्रामीण मार्ग रस्त्यावर पाणी आल्याने बंद झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे.
दरम्यान दुसरीकडे रायगडावर प्रचंड पाऊस झाला आहे. पावसामुळे पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. काही पर्यटक गडावर अडकल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ते सर्व सुखूरूप आहेत.