रात्री 1 वाजता नर्गिस दत्त रोडवरील सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार खार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. सोसायटीचे सुरक्षा व्यवस्थापक उमेश सराटे यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलिसांना दिली.
अज्ञात व्यक्ती पिवळ्या रंगाच्या कारने सोसायटीमध्ये आला, त्याने गेट क्रमांक 1 मधून कार आत आणली. 17व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये जायचं असल्याचं त्याने सिक्युरिटी गार्डला सांगितलं, पण फ्लॅट मालकाने इंटरकॉमवरून पुष्टी केल्याशिवाय कुणालाही पाठवायचं नाही, असे आदेश सिक्युरिटीला दिले होते, त्यामुळे वॉचमन श्याम पांडे यांनी अज्ञात व्यक्तीला आत जाऊ दिले नाही. तसंच बेसमेंट 2 मधील गेस्ट पार्किंगमध्ये गाडी पार्क करायला सांगितली.
advertisement
वॉचमनने सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने गाडी बेसमेंट 1 मध्ये पार्क केली, पण दुसरा गार्ड विजय यादवने त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले. यानंतर त्याने गाडीच्या चाव्या दुसरा गार्ड जावेद नवाद याच्याकडे सोपवली आणि बाथरूममध्ये जायचं आहे, असं सांगितलं. 10 मिनिटानंतर त्याने आपल्याला 14व्या मजल्यावर जायचं आहे, असं सांगितलं. यानंतर सिक्युरिटीने इंटरकॉमद्वारे रहिवाशासोबत संपर्क साधून खात्री करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा 17 व्या मजल्यावर जाण्याचा आग्रह धरला, पण तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याला सोसायटीबाहेर हाकलून दिले. यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी इमारतीची लिफ्ट बंद आढळून आली तेव्हा या प्रकरणात ट्विस्ट आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीने लिफ्टमध्ये मोठे दगड ठेवले होते आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे अश्लील हावभावही केले होते, असे दिसून आले.
याप्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला. आरोपीचा पत्ता त्याच्या कार नंबरवरून सापडला. ही व्यक्ती रुग्णालयात दाखल असून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील तपास केला जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.