मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह परिसरात वास्तव्यात असणाऱ्या ९३ वर्षीय वृद्धेचा मुलगा दुबईतील हिरे व्यापारी आहे. तो वेळोवेळी आपल्या पत्नीसोबत मुंबईत येत असे. आईच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याने घरात चार कामगार ठेवले होते. २६ जुलैला ते मुंबईत आले असता, बाथरूममधील गुप्त कप्प्यात ठेवलेले हिरे आणि सोन्याचे साडेतीन कोटींचे दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कोट्यवधींचे दागिने चोरीला गेल्याने त्यांना धक्का बसला.
advertisement
मात्र ते दुबईत असल्याने दागिने कधी आणि कुणी चोरून गेले, याचा काहीच थांगपत्ता त्यांना नव्हता. त्यांनी बाथरुममध्ये सिक्रेट कप्पा बनवून अत्यंत हुशारीने हे दागिने लपवले होते. त्यामुळे ते सहज सापडणे अशक्य होते. पण मुलाच्या पत्नीने फोनवर या गुप्त कपाटाबद्दल आणि त्यातील दागिन्यांबद्दल बोलताना आरोपी साळवीनं ऐकलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिने संधी साधून ही चोरी केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घरातील चार कामगारांची चौकशी केली. सुरुवातीपासून तेच संशयच्या भोवऱ्यात होते. मात्र, त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. प्राथमिक चौकशीत अर्चनावर संशय घेण्यात आला नव्हता, कारण ती वृद्ध महिलेकडे फक्त काही दिवसांसाठी बदलीवर काम करण्यासाठी आली होती.
अर्चनाच्या हालचालींवर पोलिसांची नजर
काही ठोस पुरावा मिळत नसल्याने पोलिसांनी अर्चनाबद्दल अधिक माहिती गोळा केली. यावेळी तिच्या मुलाने अलीकडेच २५ लाख रुपयांचा मोठा बैंक व्यवहार केल्याचे समोर आले. चौकशी सुरू होताच अर्चना गायब झाली. पोलिसांनी तिच्या कळवा येथील राहत्या घरी नजर ठेवली आणि तिने काही महिन्यांपूर्वीच नोकरी सोडल्याचं पोलिसांना समजलं.
अर्चना विरोधातील हे पुरावे पाहता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अर्चनाने गुन्ह्याची कबुली दिली. तिने काही दागिने विकल्याचे आणि काही बदलून घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित सर्व सोनारांचा माग काढून दागिने मिळवले. चोरीस गेलेल्या एक हजार ४३७ ग्रॅम दागिन्यांपैकी एक हजार २४९ ग्रॅम परत मिळवले आहेत. उर्वरित दागिनेही लवकरच जप्त केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.
