नेमकी घटना काय?
सांताक्रुझ पश्चिम येथील गजधर बांध परिसरात राहणाऱ्या रमाबाई श्रीचंद (वय ३५) यांनी रविवारी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रमाबाई या मोलकरीण म्हणून काम करत होत्या. रविवारी रात्री त्या घरी एकट्याच असताना त्यांनी स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला.
व्यसनापायी संसार उद्ध्वस्त
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाबाई यांचा पती मनुनाथ श्रीचंद (वय ३८) हा वाहनचालक आहे. त्याला मद्यपानाचं व्यसन आहे. याच व्यसनापायी पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. दारूच्या नशेत मनुनाथ हा रमाबाई यांना सतत मारहाण करत असे आणि त्यांचा मानसिक छळ करत असे.
आई आणि बहिणीला फोन करून सांगितली होती व्यथा
हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी रमाबाई यांनी आपल्या आईला आणि बहिणीला फोन केला होता. या संवादादरम्यान त्यांनी पतीकडून होणाऱ्या असह्य छळाबद्दल आपली व्यथा मांडली होती. सततची मारहाण आणि मानसिक त्रासामुळे त्या प्रचंड तणावाखाली होत्या, असा आरोपी रमाबाई यांच्या आईनं तक्रारीत केला आहे.
पोलिसांकडून आरोपी पतीला अटक
रमाबाई यांच्या मृत्यूनंतर, त्यांची आई यशोदा शिंदे (वय ६०, रा. कर्नाटक) यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेऊन जावयाविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी मनुनाथ श्रीचंद याला तातडीने अटक केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
