सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल या फक्त अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवल्या जात आहेत. तर दुसरीकडे कर्जतहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल बदलापूर येथेच थांबवण्यात आल्या आहेत. जवळपास एक ते दीड तासांपासून लोकलची वाहतूक ठप्प झाल्याने प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली आहे. प्रवासी वेळेत ऑफिस व शाळांमध्ये पोहोचू शकले नाहीत. अनेकांना गाड्यांमध्येच अडकून बसावे लागले आहे.
मालगाडीच्या बिघाडामुळे परिस्थिती अधिक गंभीर
advertisement
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे आधीच गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच मालगाडीच्या बिघाडामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रेल्वे प्रशासनाने बिघाड दुरुस्तीसाठी तांत्रिक पथके घटनास्थळी पाठवली असून शक्य तितक्या लवकर गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.
रस्ते वाहतूकही विस्कळीत
रेल्वे थांबल्यामुळे प्रवाशांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. सकाळपासून गाड्या रेंगाळत असल्याने प्रवासाचा वेळ दुप्पट वाढला आहे. "आम्ही एक तासाहून अधिक वेळ लोकलमध्येच अडकून बसलो आहोत, ना पुढे जाता येतंय ना मागे," अशी व्यथा प्रवाशांनी व्यक्त केली. मुंबईत सकाळी झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीलाही फटका बसला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. रेल्वेप्रमाणेच बससेवेतही उशीर होत आहे.
दुरुस्तीचे काम सुरू
मध्य रेल्वे ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, पावसाळ्यात वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि पाणी साचल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम ठेवण्याचे आवाहन केले असून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसोबतच राज्यातील इतर ठिकाणीही पावसाने जोर धरला आहे. पुणे घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट परिसर तसेच विदर्भातही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागात नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पाणीपातळी वाढत आहे.
हे ही वाचा :
मुंबईवर पुन्हा आस्मानी संकट! वरळी डोम परिसर पाण्याखाली तर पश्चिम रेल्वे विस्कळीत, VIDEO