मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून एका सामान्य डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे यांनी विजय मिळवला आहे. कोणतीही राजकीय बॅगराउंड नसताना त्याने हे यश मिळवलं असून तो आता मुंबई महानगरपालिकेत जाणार आहे. या निकालाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का बसला असून सामान्यांच्या पोराचा विजय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सफेद टोपी आणि विजयाचा गुलाल
advertisement
मंगेश पांगारे यांचे वडील दत्ताराम पांगारे यांनी आयुष्यभर मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम केलं. आज त्यांचाच मुलगा मुंबईच्या कारभारात आपला वाटा उचलणार असल्याने डबेवाल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. निकाल जाहीर होताच निवडणूक केंद्राबाहेर शेकडो डबेवाल्यांनी एकत्र येत पांढऱ्या टोप्या हवेत उडवून आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. "आज आमच्या घरातला पोरगा नगरसेवक झाला," अशी भावना यावेळी अनेक डबेवाल्यांनी व्यक्त केली.
सामान्यांच्या संघर्षाची पावती
कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, केवळ जनसंपर्क आणि वडिलांनी कमावलेली प्रामाणिकपणाची शिदोरी यांच्या जोरावर मंगेश यांनी ही लढाई जिंकली आहे. प्रभाग ४ मधील मतदारांनी एका उच्चशिक्षित आणि सामान्य कुटुंबातील चेहऱ्याला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. विजयानंतर मंगेश पांगारे यांनी आपल्या वडिलांच्या चरणी नतमस्तक होत हा विजय मुंबईच्या कष्टकऱ्यांचा असल्याचे सांगितले.
मुंबईच्या सभागृहात आता डबेवाल्याचा आवाज
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेत आतापर्यंत बड्या राजकारण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, मंगेश पांगारे यांच्या विजयामुळे झोपडपट्टी, मध्यमवर्गीय चाळी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एक अस्सल मुंबईकर प्रतिनिधी सभागृहात पोहोचला आहे. हा केवळ एका जागेचा विजय नसून, मुंबईच्या गल्लीबोळात घाम गाळणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याचा सन्मान असल्याची भावना डबेवाले संघटनेने व्यक्त केली आहे.
