मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येत असून, बंडखोर उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या सूत्रांनुसार, मुंबईत शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
प्रभाग रचना, उमेदवारी वाटप आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाकडून अपेक्षित न्याय न मिळाल्याने आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे डावलल्याने काहींनी थेट बंडाचा मार्ग स्वीकारला आहे. विशेष म्हणजे हे बंड केवळ एका-दोन प्रभागांपुरते मर्यादित नसून मुंबईच्या विविध भागांतून बंडखोर अपक्ष उमेदवार समोर आले आहेत.
advertisement
नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मंत्री उदय सामंत, खासदार रविंद्र वायकर, राहुल शेवाळे, शितल म्हात्रे तसेच मिलिंद देवरा यांच्याकडून स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांशी थेट संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली. पक्षाची अधिकृत भूमिका समजावून सांगत, नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेतृत्वासमोर अडचणी कायम
सूत्रांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काही उमेदवार माघार घेण्यास तयार असल्याचे संकेत आहेत. मात्र, काही बंडखोर अद्याप ठाम भूमिकेत असल्याने नेतृत्वासमोर अडचणी कायम आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्याचा दिवस शिवसेनेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
शिवसेना नेतृत्वाला यश येणार का?
बंडखोरी रोखण्यात यश न आल्यास त्याचा थेट फटका शिवसेनेच्या मतांवर बसू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आता एक दिवसात किती बंडखोरांना परत पक्षाच्या प्रवाहात आणता येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेतृत्वाची समजूत काढण्याची रणनीती यशस्वी ठरते की बंडखोरीचा फटका बसतो, हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.
