मुंबई: मुंबईतील वर्दळीसाठीचा रस्ता असलेल्या सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड मार्गावरील बोगद्यात एका कारला आग लागल्याची घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अचानकपणे कारने पेट घेतल्याने काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
advertisement
आज सकाळच्या सुमारास कोस्टल मार्गावरील बोगद्यात एका कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीच्या घटनेमुळे दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
या आगीमुळे ताडदेव, दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पांढऱ्या कारला अचानक आग लागल्याचे दिसत आहे. आगीच्या मोठ्या ज्वाळा उठून दिसल्या. या आगीमुळे बोगद्यात धूर पसरला होता. बोगद्यातून जाणाऱ्या प्रवाशांनी या बर्निंग कारचे व्हिडीओ चित्रीकरण केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ऐन सकाळीच ही घटना घडल्याने कोस्टल रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहने अतिशय धीम्या गतीने सरकत होती. कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा दिसून आल्या.