हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनही 55 मिनिटे उशिराने धावत होती. चुनाभट्टी, कुर्लासारख्या सखल भागातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता वडाळा स्थानकात पाणी साचल्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत हार्बर लाईन बंद राहील अशी उद्घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. वाशी रेल्वे स्थानकात वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
advertisement
ठाणे कर्जत खोपोली- शटल सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. तर वसई आणि विरार स्थानकातून लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. रुळांवर पाणी साचल्याने या दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, अंधेरी-चर्चगेट दरम्यानची रेल्वे वाहतूक 30-40 मिनिटं उशिराने सुरू आहे.
मागच्या 72 तासांपासून आभाळ फाटल्यासारखा मुंबई पाऊस सुरू आहे. दादर, माटुंगा, लालबाग परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे, मुलुंड, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंधेरीमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आणि धोक्याचे आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईची तुंबई सोमवारपासून झाली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा सल्ला दिला आहे. तर शाळा कॉलेज आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्या आहेत. पुढचे तीन तास 60 किमी ताशी वेगाने वारे वाहणार असून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा हाहाकार
गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषता रत्नागिरीतील प्रमुख नऊ नद्यांपैकी सहा नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. काजली नदीने इशारा पातली ओलांडल्यामुळ अंजनारी येथील स्वयंभू दत्त मंदिरात पाणी शिरले आहे . तसेच अनेक सखल भागात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. आज रत्नागिरी जिल्हाला रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये.
असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.