मुंबईतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे मंडळाने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच रिंग रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे लखनऊच्या गोमतीनगर पासून मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) स्थानकांपर्यंत धावणार आहे. प्रथमच ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये न येता मुंबईबाहेरील अर्थात कल्याण किंवा पनवेल या रेल्वे स्थानकांवरूनच पुन्हा गोमतीनगरसाठी रवाना होईल. पहिल्यांदाच रेल्वे मंडळ मुंबई महानगर प्रदेशातून रेल्वे सोडणार आहे. यामुळे मुंबई उपनगरामध्ये राहणाऱ्या अनेक प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
advertisement
नियमित एक्सप्रेससोबतच या विशेष रेल्वेही सोडल्या जाणार आहेत. छटपूजा निमित्त तब्बल 1200 विशेष एक्सप्रेसची भर पडणार आहे. या रेल्वे मुंबईतील टर्मिनसवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगरातील स्थानकांवर रेल्वेगाड्या थांबवून त्याच ठिकाणाहून परतीच्या प्रवासासाठी गाड्या धावणार आहेत. विशेष गाडी क्रमांक 05037 गोमती नगर- पुणे- पनवेल- गोमती नगर ही विशेष रेल्वे 27 सप्टेंबर, 4 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. झांसी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुण्याला पोहोचेल. त्यानंतर चिंचवड, लोणावळा येथे पोहोचेल. मुंबई महानगरातील कर्जत, पनवेल, कल्याण येथे थांबून नाशिक- इगतपुरीमार्गे पुन्हा गोमतीनगरसाठी रवाना होईल.
उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या एक्सप्रेस रिटर्न ब्रेक पॉवर सर्टिफिकेटने प्रमाणित असतात. याचा अर्थ या गाड्या तीन हजारांहून अधिक किलोमीटर तात्पुरत्या देखभालीसह धावण्यासाठी सक्षम असतात. मात्र अशा गाड्या मुंबईत येऊन एलटीटी, सीएसएमटी येथे फलाट अडवून ठेवण्याचे काम करतात. याचा फटका अन्य रेल्वेगाड्यांना बसतो. विशेष गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने आपत्कालीन साखळी ओढण्यासह अन्य प्रकार घडतात. विशेष गाड्या सीएसएमटी, एलटीटीमध्ये दाखल होत असल्याने त्याचा परिणाम लोकल फेऱ्यांवर होतो. रिंग रेल्वेमुळे मुंबईत प्रवेश न करता गाड्या धावणार आहेत. सीएसएमटी, एलटीटी येथे येणाऱ्या प्रवाशांना कल्याण, पनवेल आणि कर्जतवरून लोकलचा पर्याय उपलब्ध आहे.
यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील भार कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर लोकल वक्तशीरपणामध्ये देखील सुधारणा होण्याच मदत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळी, छटपूजा अशा सणासुदीच्या निमित्ताने प्रवासी गर्दी विभागण्यासाठी अधिकाधिक रेल्वेगाड्या विशेष म्हणून चालवण्यात येतात. रिंग रेल्वेमुळे केवळ मुंबईतील टर्मिनसला नव्हे तर देशातील अतिशय वर्दळीच्या रेल्वे टर्मिनसला लाभ होणार आहे. मुंबईत लोकलच्या रोज १८१० लोकल फेऱ्याही धावतात. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वच विशेष गाड्या मुंबई बाहेर ठेवणे शक्य होईल. असे झाल्यास मुंबई लोकल वेळेवर धावती करण्याच्या दिशेचे एक पाऊल ठरणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.