सीना नदीला लगत असलेल्या मनगोळी गावाला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. कोळेगाव वीर धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत होती. सोलापूर - पुणे, सोलापूर - कोल्हापूर व सोलापूर - विजयपूर जाणाऱ्या महामार्गावर सीना नदीचं रौद्ररूप पहायला मिळालं. सीना नदीला चिटकून असलेली सर्व शेती पाण्याखाली गेली आणि पहाटेच्या सुमारास मनगोळी गावात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरात नदीचं पाणी येण्यास सुरुवात झाली. गावकऱ्यांनी आपला जीव वाचवत जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या. कष्टाने उभारलेलं घर-दार सोडलं आणि जीव वाचवण्यासाठी तात्पुरती जागा शोधली.
advertisement
सीना नदीचा महापूर ओसरल्यानंतर गावातील ग्रामस्थ गावात आले. पण आपलं गाव, आपली घर पाहण्यासाठी गेले असता विदारक परिस्थिती पाहून कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कुणाच्या डोळ्यात भीती होती. घरामध्ये साठवून ठेवलेलं तांदूळ, सोयाबीन, डाळ, मुलांचे शाळेचे दप्तर, कागदपत्रे, संसार उपयोगी साहित्य, वाहून रस्त्यावर पडलं होतं. सीना माईच असं रूप गावकऱ्यांनी आतापर्यंत पाहिलं नव्हतं. सीना नदीला आलेल्या या महापुरामुळे मनगोळी हे गाव संपूर्ण रिकामं झालं आहे. सरकारने लवकर मदत द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.