Solapur Flood: सीनेच्या महापुरात बुडालं घर, बेघर कुटुंबाने ट्रकमध्ये मांडला संसार, मन सुन्न करणारा Video
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Flood: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव सीना नदी पात्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे.
सोलापूर: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. अशातच धरणातून केलेल्या पाणी विसर्गामुळे सिना नदी पात्र सोडून वाहत होती. सिनेच्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. अशाच एका कुटुंबाने धीर न सोडता ट्रकमध्ये आपला संसार मांडला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव सीना नदी पात्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे या गावाला जबरदस्त फटका बसला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेकांच्या राहत्या घरामध्ये देखील पाणी शिरलं आहे. डोक्यावरच छत हरपल्यानं मनगोळी गावात राहणाऱ्या परशे कुटुंबाने एका ट्रकमध्ये आपला संसार मांडला आहे.
advertisement
सोमवारी (22 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता सीना नदीचं पाणी मंगल परशे यांच्या घरात आलं. पाणी आल्याचं पाहून मंगल परशे यांनी घरामधील सर्वांना झोपेतून उठवलं. घरामधील थोडंफार संसार उपयोगी साहित्य घेऊन या कुटुंबाने घर सोडलं. अचानक आलेल्या महापुरामुळे डोक्यावरचं छत गेलं. शिवाय गावात त्यांना अचानक कुठे निवाराही मिळत नव्हता. तेव्हा गावात राहणाऱ्या समाधान यांनी त्यांना राहण्यासाठी स्वतःचा ट्रक दिला. गेल्या सात दिवसापासून मंगल परशे यांच्यासह 10 ते 12 जण या ट्रकमध्ये राहत आहेत.
advertisement
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पै-पै जमा करून उभं केलेलं घर, घरातील साहित्य, नातवंडाची दप्तरं, तीन शेळ्यांची पिलं वाहून गेली आहेत. पाणी ओसरल्यानंतर मंगल परशे घर पाहण्यासाठी गेल्या असता घरात गुडघ्याभर पाणी असल्याचं विदारक दृश्य त्यांना दिसलं.
सोलापूर जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 28, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Flood: सीनेच्या महापुरात बुडालं घर, बेघर कुटुंबाने ट्रकमध्ये मांडला संसार, मन सुन्न करणारा Video