एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, 4 नगरसेवक लावले गळाला, मुंबईत झाला पक्षप्रवेश
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राज्याच्या राजकारणात सध्या निवडणुकांचं वारं शांत झालं असले तरी, अकोल्यात मात्र पक्षांतराच्या रूपाने राजकीय भूकंप झाला आहे.
कुंदन जाधव, प्रतिनिधी अकोला: राज्याच्या राजकारणात सध्या निवडणुकांचं वारं शांत झालं असले तरी, अकोल्यात मात्र पक्षांतराच्या रूपाने राजकीय भूकंप झाला आहे. अकोला महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर अवघ्या काही दिवसांतच शिवसेना उबाठा (ठाकरे गट) गटाला मोठा धक्का बसला असून, निवडून आलेल्या ६ नगरसेवकांपैकी तब्बल ४ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे अकोल्यातील ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.
मुंबईत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
अकोला महापालिकेत उबाठा गटाच्या तिकिटावर विजय मिळवलेले मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे, केवळ नगरसेवकच नव्हे तर उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने अकोल्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यातील नगरसेवक मनोज पाटील हे मुळचे प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग ५ मधून उबाठासोबत युती करून निवडणूक लढवली होती. आणि ते जिंकूनही आले. आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.
advertisement
का घेतला पक्षांतराचा निर्णय?
पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, "आपल्या प्रभागाचा आणि संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणं आवश्यक आहे. शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे." या मोठ्या फेरबदलामुळे अकोला महापालिकेतील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
advertisement
इथं ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या ६ नगरसेवकांपैकी आता केवळ २ नगरसेवक या गटात उरले आहेत. या पक्षप्रवेशामुळे भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद कमालीची वाढली आहे. स्वीकृत नगरसेवकांसह या आघाडीची सदस्यसंख्या आता ५३ वर पोहोचली आहे.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 9:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, 4 नगरसेवक लावले गळाला, मुंबईत झाला पक्षप्रवेश









