मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे सर्व धर्मांचा आदर करणारं स्वराज्य होतं. स्वराज्यात हिंदू-मुस्लिम आणि सर्व जाती-पातींचे लोक गुण्यागोविंदानं एकत्र राहत होते. हाच सामाजिक एकतेचा संदेश देण्याचं काम मुंबईतील मेहबूब इमाम हुसेन मदुणावर हे करत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नगारा वाजवण्याचे काम ते अखंडपणे करत आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अनोखं उदाहरण म्हणून लोक त्यांच्या कार्याचा गौरव करत आहेत.
advertisement
1986 साली सुरू झालेली परंपरा
1986 साली छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी गेट वे ऑफ इंडिया इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर एक नगारा ठेवला. त्यावेळी पहिल्यांदा डॉक्टर डी. वाय. पाटील यांनी हा नगारा वाजवला. यानंतर बाबुराव जाधव यांनी ही सेवा सांभाळली. मात्र, त्यांची बदली झाल्यावर हे कार्य महेबूबजींना सोपवण्यात आले. गेल्या 30 वर्षांपासून सूर्य मावळतानाचा हा सामाजिक एकतेचा नगारा अखंड सुरू आहे.
Shiv Jayanti: इतिहासाचे बोलके साक्षीदार, विदर्भाचे शस्त्रागार, शिवरायांची ही शस्त्रं पाहिली का?
शिवराय हे सर्व धर्मीयांचे राजे
महेबूब इमाम हुसेन यांना अनेकदा प्रश्न विचारले जातात की, “तुमच्या धर्माने तुम्हाला हे कार्य करण्यास मज्जाव केला नाही का?” यावर ते ठाम उत्तर देतात. "शिवराय हे फक्त हिंदूंचे नाहीत, तर सर्व धर्मांचे राजे आहेत. त्यांच्या सैन्यात हिंदू-मुस्लीम दोघेही होते. महाराजांनी कधीही जाती-पातीचा भेद केला नाही. जो स्वराज्यासाठी लढला, तोच मावळा होता.” महाराजांच्या न्यायप्रियतेने आणि सर्वधर्मसमभावाने प्रेरित होऊन महेबूबजींनी आपले आयुष्य त्यांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.
दिवसभर विकतात टोप्या
महेबूबजी मूळचे कुलाब्याचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांना छोटे-मोठे व्यवसाय करावे लागतात. दिवसभर ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पाणी आणि काकडी विकतात. तर उन्हाळ्यात टोप्या विकण्याचा व्यवसाय करतात. पूर्वी फोटोग्राफी करायचे, मात्र त्यात फारशी कमाई न झाल्याने त्यांनी हा व्यवसाय सोडल्याचं ते सांगतात. मेहबूबजी यांना दोन मुले आहेत. दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. एक जण बँकेत नोकरी करतो, तर दुसरा फूड डिलिव्हरीचा व्यवसाय करतो.
अखंड सेवा, पण मानधन नाही
गेल्या तीन दशकांपासून महेबूबजी अखंड सेवा करत आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांची कोणतीही अपेक्षा नाही. पण प्रशासनाने त्यांच्या या सेवेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांचे सहकारी करत आहेत. महेबूबजी तरुणांना सतत प्रेरित करत असतात. "महाराजांचे गड-किल्ले पाहा. त्यांच्या इतिहासातून शिकण्यासारखे खूप आहे. शिवरायांचा न्यायप्रियता, धैर्य आणि स्वराज्यनिर्मितीचा लढा प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे," असं ते तरुणांना सांगतात.
दरम्यान, शिवरायांनी आपले जीवन स्वराज्यासाठी समर्पित केले. आज महेबूबजी त्यांच्याच विचारांचा प्रचार करत आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथे शिवरायांना मुजरा करणारा नगारा आजही अविरत सुरू आहे. तो केवळ परंपरा नाही, तर एकतेचा संदेश आहे.