विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रो मेट्रो 2A आणि 7 या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागील तीन तासांपासून मेट्रो विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. सकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
advertisement
मुंबईतील दहिसर ते अंधेरी या मार्गावरील प्रवाशांसाठी ही मेट्रो महत्त्वाची आहे. मात्र, मेट्रो वाहतूक विस्कळीत झाल्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 वर तांत्रिक कारणास्तव काही बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे काही प्रवाशांना तात्पुरती गैरसोय होऊ शकते असे मेट्रो प्रशासनाने म्हटले. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षा आणि सोयीला प्राधान्य देत हे बदल केले असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणते बदल करण्यात आले?
लाईन 2A (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व): या मार्गावरील सेवा पूर्ववत सुरू असून कोणताही अडथळा नाही.
शॉर्ट लूप सर्व्हिस: गुंदवली ते आरे या स्थानकांदरम्यान मर्यादित अंतराची सेवा सुरू आहे. या दोन स्थानकांमध्ये प्रवास करणाऱ्यांना वेगळ्या गाड्या पकडाव्या लागतील.
सिंगल लाईन ऑपरेशन: ओव्हरीपाडा आणि आरे दरम्यान दोन्ही ट्रॅकऐवजी फक्त एका लाईनवर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिकच विलंबाने आहे.
प्रवाशांवर परिणाम
या बदलांचा सर्वाधिक फटका गुंदवली, आरे आणि ओव्हरीपाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलल्याने किंवा प्रतीक्षा वेळ वाढल्याने प्रवासात थोडा विलंब होऊ शकतो.