हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव
कळंबोली येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या अवघ्या 6 वर्षांच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी घडली होती. विशेष म्हणजे, आपली चूक लपवण्यासाठी या महिलेने मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांना या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी सखोल तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबाची कसून चौकशी केली.
advertisement
बोलण्यात अडचणी, मराठीऐवजी हिंदी बोलते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर कृत्यामागे काही अजब आणि संतापजनक कारणे समोर आली आहेत. सदर महिलेला मुलगा हवा होता, मात्र मुलगी झाल्याने ती नाराज होती. त्यातच या मुलीला बोलण्यात काही अडचणी होत्या आणि ती मराठीऐवजी हिंदी बोलत असे. आपली मुलगी व्यवस्थित बोलत नाही आणि ती केवळ हिंदीचा वापर करते, यावरून आरोपी महिला सातत्याने चिडलेली असायची. तिचा पती जो आयटी इंजिनिअर आहे, त्याने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा राग शांत झाला नाही.
6 तासांच्या चौकशीनंतर गुन्हा कबूल
तपासादरम्यान असेही समोर आले की, या महिलेवर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. हत्येच्या दिवशी मुलीची आजी तिला भेटायला आली होती, परंतु तिला मुलीला भेटू दिले गेले नाही. अखेर 6 तासांच्या चौकशीनंतर या आईने आपला गुन्हा कबूल केला असून कळंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. एका लहान मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
