याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेचा देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. याठिकाणी तयार झालेली वीज महानगरपालिकेची कार्यालये आणि रस्त्यांवरील विजेसाठी केला जाणार आहे. या डम्पिंग ग्राउंडवर 20 दशलक्ष मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. सध्या या कचऱ्याचं बायोमायक्रोनिंग केलं जात आहे. दररोज सुमारे एक हजार टन घनकचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडसोबत पालिकेने करार देखील केला आहे.
advertisement
2025- 2026 या आर्थिक वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे. याशिवाय, मुंबई महानगरपालिका मध्य वैतरणा धरणावर देखील 100 मेगावॉट क्षमतेचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. यात 20 मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आणि 80 मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. हा प्रकल्पात खासगी कंपनीची मदत घेतली जात आहे. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये वीजबील भरावं लागतं. वीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून वीज खर्चात बचत करण्याचं उद्दिष्ट आहे.
वैतरणा धरणावरील प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 208 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. पिसे-पांजरापूर येथील पालिकेचं जलशुद्धीकरण केंद्र या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर चालणार आहे. त्यामुळे येथील वीज खर्चात दरवर्षी अंदाजे 12 कोटी 6 लाख रुपयांची बचत होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलविद्युत आणि सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज मुंबईसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी हरित ऊर्जेच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल असेल. या विजेचा उपयोग पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी होईल.