उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी घालून तो परिसर बांबू आणि ताडपत्रीने बंद केला होता. या कारवाईसाठी महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याविरोधात काही पक्षीप्रेमी आणि जैन समुदायातील नागरिकांनी कबुतरखाना येथे बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनादरम्यान काही महिलांनी चाकूने ताडपत्री फाडून बांबू उचकटून टाकले. परिसरात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी आणि गोंधळ उडाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांच्या हाती ब्लेड, चाकू होते. हे धारदार शस्त्र फक्त ताडपत्री फाडण्यासाठी होते, असे म्हटले जात होते. जैन समुदायातील नागरिकांनी केलेल्या या आक्रमक आंदोलनानंतर मुंबईसह राज्यात संताप व्यक्त केला जात होता.
advertisement
कबुतरखाना आंदोलन प्रकरणी दादर पोलिसांनी दंगल, बेकायदा जमाव जमवणे आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकेकडून कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने अखेर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कबुतरखाना बंद करण्याच्या कारवाईविरोधात सातत्याने स्थानिकांकडून विरोध होत आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पक्ष्यांना खाद्य टाकणे आणि कबुतरखान्यांचा विस्तार रोखणे बंधनकारक असल्याने महापालिकेला कठोर पावले उचलावी लागत आहेत.