आता 'जल मेट्रो'ने करा प्रवास?
मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य सरकारने जल मेट्रो सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राने यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या डिसेंबरपासून मुंबईत जल मेट्रो टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत तयार होणार आहे.
advertisement
कधी पासून प्रवास करता येणार?
या प्रकल्पात बॅटरीवर चालणाऱ्या विद्युत बोटींचा वापर केला जाणार असून त्यामुळे प्रवास जलद आणि पर्यावरणपूरक होईल. अहवाल सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अंतिम मार्ग निश्चित केले जातील. सुरुवातीला सहा ते आठ मार्गांचा विचार असून त्यापैकी दोन मुख्य मार्गांवर डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याचे लक्ष्य आहे.
कसा असणार हा मार्ग?
पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट-वांद्रे-जुहू-वर्सोवा या मार्गाला प्राधान्य दिले जाईल तसेच दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात रेडिओ क्लब जेट्टी विकसित केली जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवी मुंबई विमानतळावर अवघ्या 40 मिनिटांत पोहोचता येणार आहे.
हा प्रकल्प कोची येथील जल मेट्रोच्या सारखा राबवला जाणार असून सुमारे 1200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जल मेट्रोमुळे मुंबईतील रस्त्यांवरील ताण कमी होऊन प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
