मुंबई: मुंबईचा पहिला डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी मस्तान यांची लेक हसीन मस्तान मिर्झा हिच्या प्रकरणाला आता आणखी एक महत्त्वाचं वळण मिळालं आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीचं साकडं घातल्यानंतर आणि त्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या हसीन मस्तानचा आवाज थेट दिल्लीत पोहोचल्याचं समोर आलं आहे.
advertisement
बिहारमधील भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांच्या मदतीमुळे हसीन मस्तान यांनी पंतप्रधान कार्यालयापर्यंत (PMO) आपली व्यथा पोहोचवली आहे. हसीन मस्तान यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायासाठी पत्र लिहिलं होतं. याच दरम्यान काही मित्रांच्या माध्यमातून त्यांची ओळख भाजप खासदार प्रदीप कुमार सिंह यांच्याशी झाली. खासदार सिंह यांनी हसीन मस्तान यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत प्रकरण समजून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवण्यात आला.
पंतप्रधान कार्यालयाकडून पत्राच्या प्राप्तीची अधिकृत पोचपावती
या प्रयत्नांना यश आलं असून, हसीन मस्तान यांना राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पत्राच्या प्राप्तीची अधिकृत पोचपावती (Acknowledgement) मिळाली आहे. याबाबत सोशल मिडीयावर व्यक्त होताना तसंच एका वृत्त एजन्सीसोबत बोलाताना हसीन मस्तान म्हणाल्या, “मी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहिलं होतं. मी अनेकांकडे दाद मागत आहे आणी याचदरम्यान काही मित्रांच्या माध्यमातून मला बिहारचे भाजप खासदार प्रदीप कुमार सिंह यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं आणि त्यांच्या माध्यमातून माझा विषय थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला. मला राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पत्राच्या प्राप्तीची पोचपावती (अॅकनॉलेजमेंट) मिळाली. यामुळे मला प्रचंड आनंद झाला, मला जे नेहमी वाटत होतं ते खरं ठरलं— मोदी हैं,तो मुमकीन हैं.”
न्यायालयात याचिका दाखल
दरम्यान, अल्पवयात झालेला अत्याचार, घरचांनी बळजबरीने लावलेलं बेकायदेशीर लग्न, घटस्फोटानंतर संपत्ती व कागदपत्रे बळकावल्याचे गंभीर आरोप करत हसीन मस्तान यांनी आपली केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 2013 साली दाखल झालेलं हे प्रकरण 2023 मध्ये बंद करण्यात आलं होतं. मात्र आता धैर्याने हसीन मस्तान यांनी पुन्हा न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय पातळीवर हालचाली सुरू
एकीकडे कोर्टात कायदेशीर लढाई आणि दुसरीकडे दिल्लीत राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याने, हसीन मस्तान प्रकरणावर आता केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
