हा आठ पदरी महामार्ग सुमारे 379 किमी लांबीचा असून, महाराष्ट्रातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील एकूण 51 गावांमधून तो मार्गक्रमण करणार आहे. हा मार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वाहनांना प्रति तास 120 किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी मिळेल, ज्यामुळे मुंबई आणि वडोदरा दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
advertisement
पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचा टप्पा
मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेच्या पालघर जिल्ह्यातील टप्पा क्रमांक 11 मध्ये गंजाड ते तलासरी दरम्यान सुमारे 26 किमी रस्त्याचे काम समाविष्ट आहे. या टप्प्याचे काम तीन भागांत विभागण्यात आले आहे. गंजाड ते तलासरी (26 किमी)रस्त्याचे काम आर. के. सी. इन्फ्राविट या कंपनीकडे आहे. तर गंजाड ते मासवण (26 किमी) भागाचे काम मोंटो कार्लो कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. तिसऱ्या भागाचे काम जीआर इनका या कंपनीकडे आहे. सध्या गंजाड येथील नाशिक–डहाणू राज्यमार्गावरील महत्त्वाच्या इंटरचेंजचे काम जलद गतीने सुरू आहे. हा इंटरचेंज या महामार्गाच्या दळणवळण सुलभतेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
वाहतुकीसाठी नवा पर्याय
या इंटरचेंजमुळे डहाणू, बोडों, उंबरगाव, बानगाव, चिंचणी, वाढवण या किनारी भागांसह चारोटीमार्गे जव्हार, वाडा, विक्रमगड, ठाणे, नाशिक या अंतर्गत भागांतील वाहनांना जलद आणि सुलभ जोडणी मिळणार आहे. यामुळे केवळ स्थानिक प्रवासच नाही तर व्यापारी, औद्योगिक आणि पर्यटन वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल.
महामार्गाची वैशिष्ट्ये
मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवे हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा एक अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या महामार्गात आधुनिक सुरक्षा सुविधा, टोल प्लाझा, सेवा रस्ते, पादचारी पुल, आपत्कालीन मदत केंद्रे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा यांचा समावेश असेल. आठ पदरी रस्ता असल्याने या मार्गावर वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि विद्यमान मुंबई–अहमदाबाद हायवेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
आर्थिक आणि सामाजिक परिणाम
महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि गुजरात दरम्यानचा प्रवासाचा कालावधी नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीला गती मिळेल, औद्योगिक क्षेत्रांना अधिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि रोजगारनिर्मितीची संधी वाढेल. तसेच, पालघर आणि आसपासच्या भागातील पर्यटनस्थळांना अधिक पर्यटक आकर्षित होतील. मार्च 2026 हा लक्ष्य ठेवून काम सुरू असले तरी, संबंधित यंत्रणा वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पश्चिम भारतातील दळणवळण व्यवस्थेत एक नवा अध्याय सुरू होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
