मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील एका ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. मागील वर्षभरात याठिकाणी पाच ते सहा अपघात झाले असून अनेकांचे प्राण गेले आहेत. हे ठिकाणी प्रवाशांच्या मृत्यूचा हॉटस्पॉट ठरत आहे.
मुंब्रा येथील तीव्र वळणार ९ जून रोजी लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी यापूर्वी घडलेल्या काही घटनांमध्ये पाच प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. यातील दोन प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
advertisement
मुंब्रा येथे जूनमध्ये झालेल्या रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी रेल्वेच्या दोन अभियंत्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध नुकताच ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे. पोलिसांच्या तपासात रेल्वेच्या हलगर्जीमुळे ही दुर्घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्यात नावे असलेल्या रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी पोलिसांचे पथक जाऊन आले. मात्र, हे अधिकारी आढळले नाहीत, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या गुन्ह्याचा तपास चालू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे प्रशासनाने तपासात सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ तीव्र वळणावर ९ जून रोजी घटना घडली होती. या घटनेआधी त्याच ठिकाणी अन्य काही घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये पाच प्रवाशांचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी, पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर, सहा घटनांमध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते. यापूर्वी पाच प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दोन प्रकरणांची चौकशी ठाणे रेल्वे पोलिसांकडून चालू असल्याचे संबधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनांमध्ये रेल्वे प्रशासनाची हलगर्जी आहे का, हेही तपासले जात असल्याचे समजते.
