उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत अर्ज दाखल करता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसंच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उमेदवारांना संपर्क साधता येईल, असं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
advertisement
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना आता पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. परंतु महापालिकेनं आधीच्या 2 अटी रद्द केल्यानं इतर उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुरूवातीला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत कार्यकारी सहायक पदासाठी दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं ही अट होती. मात्र आता ही 'प्रथम प्रयत्नात' अट रद्द करण्यात आली आहे. तसंच पदवी परीक्षेत 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '45 टक्के' ही अटदेखील काढून टाकण्यात आली आहे. विविध स्तरातून प्रचंड मागणी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे वयोमर्यादा आहे. तसंच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यकारी पदासाठी प्रति महिना 25,500 रुपये ते 81,100 रुपये पगार मिळू शकतो.