मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. दिवाळीच्या काळात खासकरून मुंबई-पुण्याहून नागपूर आणि विदर्भात येणाऱ्या प्रवाशांची पसंती आता विमानसेवेकडे वाढली आहे. रेल्वे आणि ट्रॅव्हल्समध्ये जागा न मिळाल्याने आणि तिकिट दर तीन ते चारपट वाढल्याने प्रवासी थेट विमानाचे तिकीट बुक करत आहेत.
तिकिटांचे दर तीनपट वाढले
साधारणपणे 800 ते 1,000 रुपयांत मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीत 3,000 रुपयांवर पोहोचते. पुणे आणि मुंबईमध्ये नोकरी करणारे तसेच शिकणारे अनेक विद्यार्थी वणीसह विदर्भातील गावांतून स्थायिक झालेले आहेत. ते दरवर्षी दिवाळीला आपल्या गावी परत येतात. आधी रेल्वे किंवा एसटीने प्रवास करून ते घरी पोहोचत असत. पण आता गर्दी, जागा न मिळणे आणि प्रवासाचा लांब कालावधी तब्बल 10-12 तास यामुळे प्रवाशांनी विमानसेवा गाठली आहे. वणीवरून थेट पुण्याला जाण्यासाठी केवळ सहा ट्रॅव्हल्सची सोय आहे, तर मुंबईसाठी एकही नाही. त्यामुळे इतर पर्याय नसल्याने विमान हा पर्याय लोकप्रिय ठरत आहे.
advertisement
विमान तिकीट बुकिंगला जोर
नागपूरवरून मुंबई आणि पुण्यासाठी सकाळ-संध्याकाळ अशी विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे सुटीचे नियोजन करणारे प्रवासी एक महिन्याअगोदरच आरक्षण करून ठेवत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच बुकिंगला जोर आला असून दिवाळी जवळ येताच दर प्रचंड वाढले आहेत.
18 ऑक्टोबरपासून वाढती मागणी
या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीपासून विमान बुकिंग अधिक प्रमाणात झाले आहे. तसेच परतीसाठीही २५ ऑक्टोबरपर्यंत आरक्षणावर जोर दिसतो. मुंबई-नागपूर विमान प्रवासाचे दर 18 ऑक्टोबर रोजी तब्बल 14,000 रुपयांवर पोहोचले आहेत. सुरुवातीला हेच दर 4,000 च्या आसपास होते. दिवाळीनंतर पाडव्यापासून म्हणजे 24 ते 27 ऑक्टोबरदरम्यान नागपूर-मुंबई तिकिट दर 8,000 ते 10,000 रुपयांपर्यंत आहेत. नागपूर-पुणे विमानसेवाही या काळात दहा हजारांच्या खाली मिळत नाही.
प्रवाशांची वाढती अडचण
एकीकडे रेल्वे बुकिंग पूर्णपणे संपलेले आहे, एसटी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे तर दुसरीकडे वणीसारख्या भागातून थेट ट्रॅव्हल्सची सुविधा उपलब्ध नाही. अशा स्थितीत प्रवाशांना नाइलाजाने महागडी विमान तिकीटे घ्यावी लागत आहेत. आज एक महिन्याअगोदरच विमानाचे दर एवढे वाढले आहेत. तर दिवाळी जवळ आल्यानंतर हे दर दुप्पट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे घरी सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांपुढे मोठा आर्थिक ताण उभा राहिला आहे. तरीही वेळ वाचवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी विमानसेवेलाच पसंती दिली आहे.