'मी पोलीस आहे, तपासासाठी आलो आहे,' असं सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटणाऱ्या चोरट्याच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या फसवणूकबाजाचं सज्जाद गरीबशहा इराणी असं या आरोपीचं पूर्ण नाव असून, तो राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट पोलीस बनून नागरिकांना लुटायचा. पोलिसांच्या तपासात असं उघड झालं की, या अट्टल गुन्हेगारावर संपूर्ण राज्यात 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. इतकंच नाही तर, नवी मुंबई परिसरात त्याने 15 फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांचा गणवेश, ओळखपत्र, अधिकृत शिक्के आणि कागदपत्रे अशा गोष्टींचा वापर करत सज्जाद इराणी फसवणूकीसाठी नागरिकांकडे तपासासाठी जायचा. तपासाच्या नावाखाली सज्जाद नागरिकांकडून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घ्यायचा. अनेकदा सज्जादने वाहनचालकांना अडवून पोलिस कारवाईचा दिखावा करायचा. पोलीस कारवाईचा दिखावा करत तो नागरिकांकडून पैसे देखील उकळायचा.
advertisement
31 जुलै रोजी खारघरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिक पवन कुमार रामावतार केजरीवाल (६८) यांच्या घरी घरगुती वस्तूंची चोरी करताना सज्जादला पकडले होते. स्वतःला पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवून त्याने तिथून पळ काढला. त्याने तिथे नागरिकांना खोटे सांगितले. तो म्हणाला की, रमेश पाटील नावाच्या व्यक्तीच्या घरी गांजा सापडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचीच चौकशी करण्यासाठी मी इथे आलो होतो. चौकशी करत असल्याचे भासवून, भामट्याने केजरीवाल यांना त्यांची 1.5 लाख रुपयांची सोन्याची साखळी आणि अंगठी एका बॅगेत ठेवण्यास राजी केले आणि नंतर दागिने घेऊन पळून गेला. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमाखाली खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर, गुन्हे शाखा युनिट II च्या अधिकार्यांनी अतिरिक्त सीपी (गुन्हे) दीपक साकोरे आणि डीसीपी (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू केला. त्यांनी खारघर ते लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड पर्यंत 20 दिवसांहून अधिक काळाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, ज्यामध्ये त्यांना संशयिताने वापरलेली TVS Apache स्पोर्ट्स बाईक (MH 15 BA 1617) आढळली. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने 12 ऑक्टोबर रोजी पुण्यात सापळा रचला, जिथे त्यांनी आरोपीची पत्नी फिजा सज्जाद इराणी हिला चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी बांगड्या, हार, मंगळसूत्र, चैन, इयर रिंग्स, ब्रेसलेट, पेंडेंट आणि अंगठ्यांसह 1,186 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले, तसेच बनावट पोलिस ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत तब्बल 1 कोटी 25 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
चौकशीदरम्यान, सज्जाद इराणीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने नवी मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. "तपासात आतापर्यंत खारघर, पनवेल, कामोठे, खांदेश्वर, नेरुळ, सानपाडा, बेलापूर सीबीडी, रबाळे आणि जळगाव या पोलिस ठाण्यांमध्ये 15 तोतयागिरीच्या प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सज्जाद इराणी संबंधित अशीही माहिती मिळालीये की, तो एक कुख्यात गुन्हेगार असून ज्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) नोंदलेल्या 100 हून अनेक ठिकाणी गुन्हेगारी प्रकरणांचा समावेश आहे," असे पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांनी सांगितले. इराणी याला 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती आणि त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
