आणखी एका रेल्वे स्थानकाचा कायापालट
उलवेजवळील खारकोपर रेल्वे स्थानकात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. स्थानक परिसरात बस थांबे असले तरी येथे अधिकृत बस डेपो नाही. त्यामुळे NMMT चे बस चालक आणि वाहकांना बसमधून उतरल्यावर रस्त्यावरच थांबावे लागते.
प्रवाशांचीही अवस्था फार वेगळी नाही. रेल्वेने उतरल्यावर बससाठी वाट पाहताना उन्हातान्हात उभं राहावं लागतं. पावसाळ्यात तर प्रवाशांना आजूबाजूच्या इमारतींच्या पोर्चमध्ये किंवा दुकानांच्या छपराखाली थांबावे लागते. याबाबत स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून नाराजी व्यक्त करत आहेत.
advertisement
मात्र आता या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. रविवार 11 जानेवारीपासून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खारकोपर रेल्वे स्थानकासमोरील जागेची पाहणी सुरू केली आहे. येथे बस डेपो उभारण्याच्या दृष्टीने जमीन उपलब्धता, वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेऊन सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.
विमानतळाशी थेट जोडले जाणार
खारकोपर आणि उल्वे परिसरातून NMMT बस सेवा नेरूळ, बेलापूर, घणसोली आणि नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणी देतात. विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित बस डेपो आणि स्थानक विकासामुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
