अशी झाली वादाची सुरूवात? कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत दावा केला की, "लंडनवरून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ती समकालीन वाघनखं आहेत. या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला असे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. आपण व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट म्युझियमला एक पत्र लिहिले होते, त्यामध्ये ही माहिती आपल्याला मिळाली आहे" यावेळी इंद्रजीत सावंत यांंनी म्युझियमने पाठवलेल्या पत्राचा पुरावा देखील माध्यमांसमोर सादर केला. त्यानंतर राज्यात विरोधकांकडून मुनगंटीवार आणि राज्यसरकारवर शाब्दिक हल्ला चढवण्यात आला.
advertisement
मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, सावंत पुन्हा बरसले: आज विधानमंडळाच्या सभागृहात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनी हल्ला चढवल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिले, काही कागदोपत्री पुरावे देखील सादर केले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने लंडनमधून आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, असा दावा कोणी केला नाही अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. पण सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केलेलं निवेदन धादांत खोटं आणि चुकीची माहिती देणारे आहे, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. सरकारने आत्तापर्यंत वाघनखे संदर्भात काढलेल्या GR मध्ये शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे असा स्पष्ठ उल्लेख केला आहे, मग मंत्री महोदय डोळे झापून GR काढतात का? असा सवाल देखील उपस्थितीत केलाय.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सभागृहातील निवेदनानंतर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे कशाप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायेत. याबाबत कागदपत्रे आणि पुरावे सादर केले.
रामदास आठवले काय म्हणाले? " लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे हे शिवाजी महाराजांचीच आहेत. अफजलखानाचा वध केलेली ती वाघ नखे आहेत. शंभर टक्के खरी शिवाजी महाराजांची ती वाघ नखे आहेत. म्हणून, ती लंडनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली आहेत. ऑब्जेक्शन घेऊन संभ्रम निर्माण करू नये. अफजलखानाचा वध केलेलीच ती वाघनखे आहेत, अशी आपल्याकडे माहिती आणि रेकॉर्ड आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ती वाखनखे भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला आहे." असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
