ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात माणकोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्यात आलंय. हे भव्य शिवमंदिर शिवप्रेमींमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट उंच आहे. परिसरात साकारलेली 36 शौर्यशिल्पं हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहेत.
रहस्यमय शिवलिंग! ज्यावर पाणी अर्पण करणं वर्ज्य, फक्त पानां-फुलांनी केली जाते पूजा!
advertisement
शिवाजी महाराजांची मूर्ती
या मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून साकारण्यात आली आहे. तिची उंची सहा फूट आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती घडवली आहे. योगीराज यांनी साकारलेली ही पहिलीच भव्य मूर्ती आहे. चार वर्षांपूर्वी या मूर्तीचं काम सुरू झालं होतं. मध्यंतरी रामलल्ला मूर्तीच्या कामामुळे त्यात खंड पडला होता. मात्र नंतर त्यांनी विविध ऐतिहासिक संदर्भ, पोषाख, मुद्रा आणि राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करून ही मूर्ती पूर्ण केली.
मंदिर परिसरात शौर्यशिल्पं
मंदिराच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या जीवनातील 36 महत्त्वपूर्ण प्रसंगांवर आधारित शिल्पचित्रं साकारण्यात आली आहेत. यात अफझलखान वध, आग्र्याहून सुटका, तानाजी मालुसरेंचा सिंहगड लढा आणि राज्याभिषेक यांसारख्या घटना समाविष्ट आहेत. या प्रत्येक प्रसंगाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती दिली आहे, जेणेकरून विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना समजायला सोपे जाईल.
दरम्यान, भिवंडीतील हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सध्या शिवभक्तांसाठी नवे तीर्थस्थळ ठरत आहे. परिसर स्वच्छ, शांत आणि भाविकांसाठी अनुकूल आहे. शिवचरित्राची प्रेरणा घेणाऱ्यांसाठी येथे पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं बरंच काही आहे.
कसे जाल?
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या माणकोली गावातील मांडीत परिसरात आहे. मुंबई शहरापासून सुमारे 1 ते दीड तासांच्या अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत रस्ता मार्गे सहज पोहोचता येते. भिवंडी-कळवा मार्गावरून किंवा मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे माणकोली फाट्यापर्यंत येऊन मंदिर गाठता येते.