नवी मुंबई : मुंबई शहरातील प्रवासाचे मुख्य साधन हे लोकल ट्रेन आहे. याच लोकलच्या गर्दीतून दररोज लोक जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात अनेकदा लोकल पकडताना गडबडीत अपघातही घडतात. सध्या असाच एक प्रकार मुंबईतून समोर आलेला आहे. जिथे धावती लोकल पडकताना एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे.
advertisement
एका चुकीच्या घाईनं हिरावलं प्रवाशाचं आयुष्य
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रवाशाचे नाव जयेश मळेकर (वय 41) असे असून ते मुंबई सेंट्रल येथील रहिवाशी होते. शुक्रवारी (ता. 7) ते काही कामानिमित्त नवी मुंबई येथे गेले होते. मात्र, पुन्हा घरी परतताना वाशी रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडण्याच्या घाईत त्यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांचा तोल गेल्याने ते काही अंतर प्लॅटफॉर्मवर फरफटत गेले आणि थेट प्लॅटफॉर्मवर पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वाशी रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्यांना जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जयेश मळेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वारंवार सूचना दिल्या जातात की धावती लोकल पकडू नये तसेच चढताना किंवा उतरताना पूर्ण ट्रेन थांबल्यानंतरच उतरावे. मात्र, अशा सूचना अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. जयेश मळेकर यांच्या दुर्दैवी मृत्यूने पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की अति घाईने काय होते. रेल्वे पोलिसांनी सर्व प्रवाशांना सावध राहण्याचे आणि सुरक्षित प्रवासाचे आवाहन केले आहे.
