27 डिसेंबर 2025 रोजी गाडी क्रमांक 22225 सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-16 (C-16) कोचमधील शौचालयात अचानक साप दिसून आला होता. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ते शौचालय बंद केले आणि सोलापूर स्थानकावर सर्पमित्राच्या मदतीने सापाला सुरक्षित बाहेर काढले. या विचित्र घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
advertisement
Mumbai: लोकलच्या गर्दीतून सूटका! आता ‘जल मेट्रो’ सुसाट, 10 मार्गांचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आरपीएफच्या माध्यमातून तपास सुरू केला. कोचमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका संशयित व्यक्तीने मुद्दाम पिशवीतून साप आणून शौचालयात सोडल्याचे स्पष्ट झाले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर पथकाने सापळा रचून 12 फेब्रुवारी 2026 रोजी मुंब्रा येथून जगन भाले याला ताब्यात घेतले.
आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 (ब), 147 आणि 153 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून रेल्वेने दिला आहे. आरपीएफच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.






