विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा
राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मंगळवारपासून दहावीचे विद्यार्थी आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. या प्रवेशपत्रावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी तसेच शाळेचा अधिकृत शिक्का असणे बंधनकारक आहे. या दोन्ही गोष्टी नसल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास अडचण येऊ शकते.
advertisement
दहावी प्रवेशपत्रांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण मंडळाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. शाळांनी वेळेत प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत तसेच कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्रासाठी पैसे घेऊ नयेत असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता असून तयारीला अंतिम टप्प्यात वेग आला आहे. प्रवेशपत्रे वेळेत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र, विषयांचे वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती आधीच समजणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नियमितपणे माहिती तपासावी असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
