ठाणे शहरात एका माथाडी संघटनेचा पदाधिकारी अजय पासी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यात पोखरण रोड क्रमांक दोन येथील होम ऑफ फेथ शाळेच्या समोरील रस्त्यावरुन दुचाकीची रॅली काढली. ही रॅली पूर्व दृतगती महामार्गावरुन कॅडबरी सिग्नल आणि नितीन कंपनी जंक्शन या परिसरातून रॅली नेली. यावेळी 100 ते 150 दुचाकीस्वार तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. दुचाकीवर ट्रिपलसीट फिरणाऱ्या या तरुणांनी हेल्मेट वेअर केले नव्हते. शिवाय, दुचाकी स्वारांच्या निघालेल्या रॅलीने वाहतुकीचे नियम सर्व धाब्यावर बसवले.
advertisement
बाईक रॅलीतल्या सर्वच हुल्लडबाजांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने पूर्व दृतगती महामार्गावरील सिग्नलवर कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे, मनाई आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण केल्याबाबत चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अजय पासी, ओमकार पांचाळ, अनिकेत तमट्टा, आकाश बिंद, राज सोनार या पाच जणांना ताब्यात घेत कलम 35 (3) अन्वये नोटीस पाठवली असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
बांधकाम साईटवर काम मिळाल्यामुळे अजय पासी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही दुचाकी रॅली काढली होती. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना एका जागरूक नागरिकाने याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवला होता. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. "ठाण्यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींवर येत्या काळात कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियाववर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोंवर पोलिस यंत्रणा करडी नजर ठेवणार असून अशाच पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
