मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान कोस्टल रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर, आता बीएमसी वर्सोवा ते दहिसरपर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेणार आहे. हा प्रकल्प काही भागात डबल एलिवेटेड रोड (दुहेरी उन्नत मार्ग) आणि काही ठिकाणी खाडीतून बोगदा तयार करण्यात येणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोडला जोडून पश्चिम आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प सहा टप्प्यात बनणार असून यासाठी 16,621 कोटी रुपये इतका निधी लागण्याची शक्यता आहे.
advertisement
वर्सोवा- दहिसर कोस्टल रोड अंदाजे, 22 किमी लांबीचा असण्याची आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवासातला बराच वेळ वाचणार आहे. महापालिकेच्या जमिनीवर कोस्टल रोडचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी सरकारी जमिनीबरोबरच खासगी जमिनीचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेला भूसंपादनासह अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. मढ ते वर्सोवा खाडीपर्यंत या भागामध्ये एक पूल बांधला जाणार आहे. मालाड पश्चिम परिसर आणि कांदिवलीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मालाड- मार्वे- मनोरी रस्त्याची रूंदी सुद्धा वाढवली जाणार आहे. विकास योजनेअंतर्गत सेवा रस्ते आणि इतर रस्त्यांवरही काम केले जाईल.
कोस्टल रोड संबंधित कामांसाठी एकूण 350 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यापैकी जवळपास 200 हेक्टर जमीन कोस्टल रोडसाठी संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे, भूसंपादन कामासह विविध मंजुरी मिळविण्यासाठी महानगरपालिकेने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा देखील जारी केली आहे. वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे काम सहा टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिला टप्पा वर्सोवा ते बांगुर नगर, दुसरा टप्पा बांगुर नगर ते माइंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणी, तिसरा टप्पा माइंड स्पेस-मालाड ते चारकोप उत्तरेकडे बोगदा, चौथा टप्पा चारकोप ते माइंड स्पेस मालाड दक्षिण बोगदा, पाचवा टप्पा चारकोप ते गोराई आणि शेवटचा आणि सहावा टप्पा गोराई ते दहिसर असा असणार आहे, या प्रकल्पात रस्ता, उड्डाण पूल आणि केबल पूल यांचा समावेश आहे.
