विरार लोकल प्रवाशांचे 'अच्छे दिन'
आतापर्यंत मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्या एकाच मार्गावरून धावत होत्या. त्यामुळे अनेक वेळा मेल-एक्सप्रेस गाड्यांमुळे लोकल सेवा विस्कळीत होत असे. विशेषतहा विरार फास्ट लोकल बोरिवली स्थानकाजवळ थांबवण्यात येत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
पश्चिम रेल्वेवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाला होता. याची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. महिनाभरात ब्लॉक घेऊन आणि वेळापत्रकात बदल करत हे काम पूर्ण करण्यात आले.
advertisement
या नवीन सहाव्या मार्गिकेमुळे आता मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्या स्वतंत्रपणे धावू शकणार आहेत. त्यामुळे लोकल सेवेला होणारा अडथळा कायमचा दूर होणार आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ई. श्रीनिवास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गिकेची तपासणी केली. आवश्यक स्पीड चाचण्या घेतल्यानंतर सहावी मार्गिका नियमित रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बोरिवलीपुढे विरार आणि डहाणूच्या दिशेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
