मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे. लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलच्या मार्गावर गर्दी काही केल्या कमी होत नाही. तर दुसरीकडे रस्ते वाहतूकही जिकडे तिकडे कोंडीत सापडली आहे. अशातच आता मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्रातून प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. कोचीच्या धर्तीवर मुंबईतही ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकराने मोठं पाऊल टाकले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) या अनुभवी संस्थेची निवड करण्यात आली आहे.
advertisement
कोचीमध्ये २०२३ मध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात जलवाहतुकीसाठी नवे दार खुले झाले. कोची मेट्रोने उभारलेल्या हायब्रिड इलेक्ट्रिक बोट्स, आधुनिक टर्मिनल्स आणि स्मार्ट तिकिटिंग प्रणालीमुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर झाला. आता हाच अनुभव मुंबईत उतरवण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ८ महत्त्वाच्या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामध्ये नरिमन पॉइंट-वांद्रे आणि वांद्रे-वर्सोवा हे दोन प्रमुख मार्ग निश्चित झाले आहेत. उर्वरित सहा मार्गांवर सध्या काम सुरू असून, यात मीरा-भाईंदर, वसई, गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, ऐरोली, बेलापूर, कल्याण अशा भागांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
टर्निंग पॉइंट ठरणार
या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे सोपवण्यात आली असून, स्थानिक प्रशासन, पोर्ट ट्रस्ट आणि पर्यावरण विभागाशी समन्वय साधून काम सुरू आहे. जागा अधिग्रहण, परवानग्या, टर्मिनल्सचे नियोजन, बोटींची निर्मिती या सर्व टप्प्यांवर काम वेगाने सुरू आहे. वॉटर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना एक नवीन, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्त्यावरील वाहतूककोंडी आणि लोकलमधील गर्दीला पर्याय म्हणून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. शिवाय, ही सेवा पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते.
डिजिटल तिकीट सुविधा
मुंबई वॉटर मेट्रोमध्येही हायब्रिड इलेक्ट्रिक बोट्स, वातानुकूलित टर्मिनल्स, क्यूआर कोड तिकिट बुकिंग, मोबाइल अॅप अशा आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना ‘कॉमन कार्ड प्रणाली’ मिळणार आहे. म्हणजेच, एकाच कार्डने लोकल, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रो सर्व सेवांचा वापर करता येणार.
देशातील पहिला जल मेट्रो सेवा
कोची वॉटर मेट्रोची वैशिष्ट्यं उल्लेखनीय आहेत. सुमारे ७४७ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या प्रकल्पात ७८ हायब्रिड इलेक्ट्रिक बोट्स आणि ३८ टर्मिनल्स तयार करण्यात येत आहेत. बोट्समध्ये एसी, वायफाय, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित दरवाजे अशा सुविधा असून, कोची शिपयार्डमध्येच या बोट्स तयार करण्यात आल्या आहेत.
असे असणार संभाव्य मार्ग
नारंगी-खारवाडेश्वर
वसई-मीरा-भाईंदर
फाऊंटन जेट्टी-गायमुख-नारगी
कोलशेत-काल्हेर-मुंब्रा-कल्याण,
कल्याण-मुंब्रा-मुलुंड-ऐरोली
वाशी-भाऊचा धक्का
भाईंदर-वसई-बोरिवली
नरीमन पॉइंट-मांडवा,
बेलापूर-गेटवे-मांडवा,
बोरिवली-गोराई-नरीमन पॉइंट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबईच्या समुद्रात जलवाहतूक करण्यासाठी वॉटर मेट्रो करत आहोत. कोची सरकार प्रमाणे मुंबईत वॉटर मेट्रो साठी काम करत आहोत. डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्र्यांना तो अहवाल सादर करणार आहोत. २ रूट हे डिसेंबर २०२६ पासून सुरू करणार आहोत. मुंबईच्या हक्काची टॅक्सी आहे तसे वॉटर मेट्रो सुरु करू, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
