भरत अहिरे असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय पतीचं नाव आहे. तो एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. पोलिसांनी पतीची हत्या घडवून आणणारी पत्नी राजश्री अहिरे हिला अटक केली आहे, तर तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि अन्य एक आरोपी फरार आहेत. दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे हा खून घडला. गेल्या महिन्यात भरत आणि राजश्री यांच्यात याच विषयावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी भरतने चंद्रशेखरला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलावले. १५ जुलै रोजी रात्री चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार 'रंगा' हे भरतला भेटले. त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
यावेळी चंद्रशेखरने भरतच्या छातीवर आणि पोटावर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. आरोपी 'रंगा'ने भरतला मागून पकडले होते, तर तिथे उपस्थित असलेली पत्नी राजश्री फक्त बघत राहिली. तिने पतीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. स्थानिक नागरिक जमा होत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले. यानंतर आरोपी राजश्रीने जखमी अवस्थेतील भरतला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्याला घरी आणले आणि ३ दिवस उपचार न करता तसेच ठेवले. अखेर ५ ऑगस्ट रोजी भरतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलीच्या जबाबातून हत्येचा खुलासा
या दाम्पत्याला १३, ५ आणि ३ वर्षांची तीन मुले आहेत. वडिलांची वाईट अवस्था पाहून मोठ्या मुलीने नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर भरतच्या वहिनीने घरी आल्यावर राजश्रीला याबद्दल विचारले, तेव्हा राजश्रीने भरतचा दुचाकी अपघातात जखमी झाल्याचे खोटे सांगितले.भरतला रुग्णालयात दाखल केल्यानंतरही राजश्रीने हीच खोटी कहाणी सांगितली, ज्याला दबावापोटी भरतनेही दुजोरा दिला.
मात्र, पोलिसांना त्यांच्या जबाबात काहीतरी गडबड वाटली. पोलिसांनी भरतच्या १३ वर्षीय मुलीची चौकशी केली, तेव्हा तिने वडिलांना मारहाण झाल्याचे आणि आई फक्त बघत उभी होती, असे पोलिसांना सांगितले. या जबाबामुळेच हत्येचे बिंग फुटले. पोलिसांनी आरोपी राजश्रीला अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.