या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. लातूरमधील ही घटना ताजी असताना आता अशाच घटनेची पुनरावृत्ती ओडिशात घडली आहे. इथं तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर अमानुषतेचा कळस गाठला आहे. आरोपींनी पीडित मुलीवर वारंवार सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गुन्हा लपवण्यासाठी पीडित मुलीला थेट जिवंत पुरण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
advertisement
आरोपींच्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. भाग्यधर दास आणि पंचानन दास असं अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. तर टुलू बाबू असं फरार आरोपीचं नाव आहे. भाग्यधर आणि पंचानन दास दोघंही नात्याने भाऊ लागतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशामधील जगतपूर जिल्ह्याच्या बनशबरा गावातील आहे. याच गावातील भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन भावांनी त्यांचा साथीदार टुलू बाबू यांच्या मदतीने पीडित मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केले. या सततच्या लैंगिक शोषणातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन्ही भावांना अटक केली. मात्र, तिसरा आरोपी टुलू बाबू हा गावातून पळून गेला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.