ग्रेटर नोएडा : सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे. मात्र, याच मोबाईलच्या निमित्ताने एका व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडली. खिशात ठेवलेल्या विवो कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाला. यानंतर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.
एका तरुणाने आपल्या खिशात मोबाईल ठेवलेला असताना त्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ऋषि असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडा शहराच्या अल्फा 1 परिसरात ही घटना घडली.
advertisement
हा तरुण एका फॅक्टरीत काम करतो. त्याने सांगितले की, तो कारमध्ये बसणार असताना अचानक त्याच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. त्यामुळे त्याच्या कपड्यालाही आग लागली. सुदैवाने कार सुरू नव्हती. कार सुरू असती तर आणखी भयानक स्थिती निर्माण झाली असती. मात्र, तरुण यामध्ये जखमी झाला. त्याची तब्येत सुधरण्यास पुढील 10 दिवस लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. तर त्याचा हा फोन 3 वर्षे जुना होता. तसेच त्याने 10 हजार रुपयात खरेदी केला होता, असे त्याने सांगितले.
नवऱ्याने आणले 500 रुपयांचे फटाके, बायकोला आला राग, दोघांच्या वादात घडली हादरवणारी घटना
तरुणाचे महत्त्वाचे आवाहन -
या घटनेनंतर तरुणाने लोकांना आवाहन केले आहे की, आपल्या मोबाईलला आपल्या शरीरापासून दूर ठेवावे आणि मोबाईल फोनला स्पीकरवर ठेऊनच त्याचा वापर करावा. दरम्यान, या मोबाईलमध्ये स्फोट कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण जास्त उष्णता आणि दीर्घकाळापर्यंत वापरामुळे त्याचा स्फोट होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
