बुधवारी संध्याकाळी रेणू यांना वारंवार फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे घाबरून कुटुंबातील सदस्य घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला, पण तरीही रेणू यांनी दार उघडलं नाही, अखेर त्यांनी दार तोडलं, तेव्हा त्यांना रेणू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. हल्लेखोरांनी रेणू यांचे हात आणि पाय बांधले, तसंच त्यांच्यावर चाकू आणि कात्रीने अंदाधुंद वार केले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रेणू यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रेशर कुकरचाही वापर केला गेल्याचं तपासात समोर आलं आहे.
advertisement
हल्लेखोरांनी फ्लॅट सोडण्याआधी पुरावा नष्ट करण्यासाठी आंघोळही केली. तसंच ते रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले.
मोलकरणीवर संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरकाम करणारी महिला हर्षा (वय 20) ही फक्त 10 दिवसांपासून तिथे काम करत होती. तिचा मित्र रोशन हादेखील सीसीटीव्हीमध्ये दिसला आहे, त्यामुळे पोलिसांना या दोघांवर संशय आहे.
काय म्हणाले पोलीस?
'काल संध्याकाळी हैदराबादच्या कुकटपल्ली पोलिसांना 50 वर्षांच्या महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आमचे निरीक्षक आणि पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना महिलेचा चाकूने वार केलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. झारखंडहून आलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या आणखी एका साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याचा संशय आम्हाला आहे', असं पोलीस अधिकाऱ्याने एएनआयसोबत बोलताना सांगितलं.
पोलिसांनी तपास करताना गुन्ह्याच्या ठिकाणाहून बोटांचे ठसे गोळा केले, तसंच वेगवेगळ्या ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेज विश्लेषणही सुरू आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. आरोपीचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? हेदेखील शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.