दिल्लीजवळच्या हरियाणामधल्या फरीदाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. फरीदाबादमधल्या ग्रीन फिल्ड कॉलनीमध्ये रविवारी रात्री हा अपघात झाला. यामध्ये सचिन कपूर, त्यांची पत्नी रिंकू कपूर आणि मुलगी सुजान कपूर यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर मुलगा आर्यन कपूर याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक पसरला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अचानक मोठा आवाज झाला, यानंतर घरातून धूर निघायला सुरूवात झाली. आवाज ऐकून बिल्डिंग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बाहेर आले आणि त्यांनी फायर ब्रिगेडला बोलावलं. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण घरामध्ये धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे गुदमरून घरातल्या तिघांचा मृत्यू झाला, यात कपूर यांच्या घरातील पाळीव प्राण्याचाही शेवट झाला.
advertisement
ज्या घरामध्ये एसीचा ब्लास्ट झाला, त्या महिलेने या संपूर्ण घटनेबद्दल माहिती दिली आहे. 'मी आपल्या मुलीसोबत राहते. रात्री 3 वाजून 10 मिनिटांनी आमच्या घरातल्या स्प्लिट एसीला आग लागली. मी सगळ्यांना झोपेतून उठवलं, आग विझवत असताना माझे हातही जळले', असं या महिलेने सांगितलं आहे. 'मी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास कपूर कुटुंबाशी बोलले. धूर खूप आहे, काही दिसत नाहीये. आम्ही बाहेर कसे येऊ, असं ते मला म्हणाले. मला त्यांचे ते शब्द सारखे आठवत आहेत', असं महिला म्हणाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीसही तिथे आले, तसंच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमला पाठवले. सुरूवातीच्या तपासात आग लागण्याचं कारण एसीचा ब्लास्ट आणि शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे, पण फॉरेन्सिक टीमच्या विस्तृत तपासानंतर कारण स्पष्ट होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग करताना सावधगिरी बाळगा, तसंच उपकरण खराब झाल्याचे संकेत मिळाले तर लगेचच त्याची दुरुस्ती करा, असं आवाहन यंत्रणांनी नागरिकांना केलं आहे.