काळजाचा थरकाप उडवणारी घटना पुन्हा एकदा घडली. 161 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचताच समजलं की एक इंजिन बिघडलं आहे. थेट इमर्जन्सी कॉल देण्यात आला. वैमानिकानं मोठ्या कौशल्यानं 161 प्रवाशांचे प्राण वाचवले, हवेतच अचानक इंजिन बंद पडल्याने टेन्शन वाढलं, मात्र वैमानिकानं मोठ्या धीरानं आणि प्रसंगावधान राखून इमर्जन्सी लॅण्डिंगचा अलर्ट दिला आणि मोठा अनर्थ टळला.
advertisement
इंदौर विमानतळावर शुक्रवारी सकाळी एका हृदयाचा ठोका चुकवणारी ही धक्कादायक घटना घडली. दिल्लीहून इंदौरकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या इंजिनात अचानक तांत्रिक बिघाड झाला. पायलटने एटीसीला तत्काळ माहिती दिली आणि विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. या विमानात 161 प्रवासी होते.
सकाळी 9.54 वाजता जेव्हा विमान सुरक्षितपणे लॅण्डिंग करण्यात आलं. त्यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत होतं. अनेकांनी हात जोडून देवाचे आभार मानले. क्षणभर असं वाटलं की आता काय होणार, पण वैमानिकाच्या कौशल्यामुळे सगळे सुरक्षित असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
एटीसीकडून मिळालेल्या सूचनेनंतर विमानतळावर अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स आणि CISF च्या टीम्स काही क्षणात सज्ज होत्या. विमान धावपट्टीवर स्थिरावताच सर्व टीम्सनी सुरक्षिततेची जबाबदारी हातात घेतली. प्रवाशांना व्यवस्थित बाहेर काढण्यात आलं आणि सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याची खात्री झाली. विमानाचं इंजिन अचानक बंद कसं झालं याची चौकशी आणि तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे विमान दिल्लीला परत पाठवलं जाणार आहे.