या अपघाताबाबत माहिती देताना लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका चौकीकडे जात होते. यावेळी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा आंतरराज्य महामार्गावरील खानी टॉप परिसरात लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा मृत्यू झाला असून उर्वरित जवान गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. स्थानिक नागरिकही पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेदरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांनाही दरीतून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघा जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
दरम्यान लष्कराने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगितले आहे की, अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे.
