नेमकं काय काय झालं?
बुधवारी सकाळी ही घटना घडल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना ही घटना घडली. यावेळी एक व्यक्ती आली, त्यानं मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री रेखा यांच्या जवळ गेला अन् त्यांना चापट मारली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी गंभीर धक्काबुक्की देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. ही त्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे.
advertisement
दिल्ली पोलिसांकडून अटक
दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनवाई दरम्यान झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीये. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पोलिस चौकशीतून तपशील उघड होणार, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्रींवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी व्यक्तीची चौकशी दिल्ली पोलिसांच्या पथकांकडून केली जात आहे. डीसीपी नॉर्थ जिल्ह्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत आहेत. आरोपीने नेमकी प्रवेश कसा मिळवला आणि तो थेट मुख्यमंत्रींपर्यंत कसा पोहोचला, याबाबत स्टाफचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोण आहेत रेखा गुप्ता?
20 फेब्रुवारी 2025 रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा 29595 मतांनी पराभव केला. रेखा बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.