कुठे घडली घटना?
बिहारच्या गया जिल्ह्यातील बोधगया परिसरातून समोर आला आहे. बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमवा गावात शिक्षक राणा कुलेश्वर हे आपल्या कुटुंबासह राहतात. रोजच्याप्रमाणे सर्व कामे आटोपून राणा कुलेश्वर, त्यांची पत्नी नीलू कुमारी आणि त्यांची चिमुकली रात्री गाढ झोपेत होते. बाहेर किर्रर्र अंधार आणि शांतता होती. मात्र, ही शांतता एका भयानक कटाची चाहूल होती. रात्रीचे साधारण २:३० वाजले असावेत.
advertisement
दबा धरुन बसले आणि संधी साधली
जेव्हा हे कुटुंब साखरझोपेत होते, तेव्हा राणा यांचा मोठा भाऊ मुकेश कुमार आणि त्याची पत्नी खिडकीपाशी दबा धरून बसले होते. त्यांनी खिडकीवाटे खोलीत पेट्रोल ओतले आणि काही कळण्याच्या आतच तिथे आग लावून दिली. बघता बघता आगीच्या ज्वाळांनी खोलीला विळखा घातला. झोपेत असलेल्या या कुटुंबाला काही समजायच्या आतच आगीच्या झळा बसू लागल्या.
चिमुकलीच्या किंकाळ्यांनी गाव हादरलं
आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केल्यावर नीलू आणि राणा यांना जाग आली. आगीच्या वेढ्यात अडकलेल्या आपल्या पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी जिवाचा आकांत केला. या आगीत मुलीचा चेहरा आणि शरीर भाजले गेले. नीलू आणि राणा हे देखील आगीत होरपळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे लोक धावत आले आणि त्यांनी तातडीने खिडकी तोडून किंवा दरवाजा उघडून कुटुंबाला बाहेर काढले. सर्वांना तातडीने मगध मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फक्त एक इंच जमीन वादाचं कारण
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नीलू कुमारी यांनी रडत रडत आपली कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, आमच्या घरात जमिनीच्या वाटण्या झाल्या. पण मुकेश असं वाटत होतं की आम्हाला एक इंच जमीन जास्त मिळाली आहे. याच एका इंचाच्या जमिनीसाठी तो सतत भांडायचा. यापूर्वीही त्याने अनेकदा मारहाण केली होती. माझे सासू-सासरे आमच्यासोबत राहतात, त्यांनाही तो त्रास द्यायचा. पण तो आज इतक्या थराला जाईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं." केवळ एका इंचाच्या जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचं घर आणि कुटुंब राख करण्याचा हा प्रयत्न पाहून संपूर्ण गाव हादरून गेलं.
पोलीस तपासात काय समोर आले?
या घटनेची माहिती मिळताच बोधगया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही भावांमध्ये जमिनीचा वाद जुना होता आणि तो विकोपाला गेला होता. आरोपी मुकेश कुमार याने अत्यंत थंड डोक्याने हा कट रचून पेट्रोलचा वापर केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. "आम्ही पुराव्यांची जमवाजमव करत आहोत आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले.
