याआधी सीपी राधाकृष्णन यांनी 11 ऑगस्टला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली होती. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत, त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये असलेली स्टॅलिन यांची डीएमके एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
काही आठवड्यांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे रुग्णालयात दाखल होते. स्टॅलिन यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सीपी राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं होतं.
सीपी राधाकृष्णन यांनी स्टॅलिन यांची भेट घेण्याच्या दोन दिवस आधी डीएमकेच्या लोकसभेच्या गटनेत्या कनिमोळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचं कनिमोळी यांनी सांगितलं. तसंच थोथुकुडी विमानतळाच्या कामाबद्दल कनिमोळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. ऑपरेनशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जगाला सत्य सांगण्यासाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये असलेल्या कनिमोळी यांनी परदेशामध्ये जाऊन भारताची अधिकृत भूमिका मांडली.
तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका
तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत, त्यामुळेही एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी दिलं गेल्याचं बोललं जात आहे. तामिळनाडूच्या निवडणुका असल्यामुळे डीएमके उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या तामीळ उमेदवाराला पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच डीएमकेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर हा इंडिया आघाडीसाठी मात्र धक्का असेल, कारण स्टॅलिन यांचा डीएमके हा इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष आहे.