बेंगळुरू: कर्नाटकातील चिकबल्लपूर जिल्ह्यातील एक शेतात अजब आणि थरारक प्रकार समोर आला आहे. एखाद्या चित्रपटासारख्या या घटनेत केंचारलहळ्ळी पोलिसांनी मोठ्या डुकर चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याने एका रात्रीत तब्बल 100 हून अधिक डुकरे चोरून ती पहाटेपर्यंत विकल्याचा आरोप आहे.
advertisement
या प्रकरणातील आरोपीचे नाव आनंदा (वय 29) असून तो आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेनिन नगरचा रहिवासी आहे. विशेष बाब म्हणजे आनंदा स्वतः डुक्कर पालनाचा व्यवसाय करत होता. पण त्याच वेळी तो पशुधन चोरीच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
ही धक्कादायक चोरी 5 नोव्हेंबर रोजी घडली. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील बुरुडुगुंटे गावातील शेतकरी वेंकटपथी यांच्या नऊ गोठ्यांमध्ये सुमारे 110 डुकरे ठेवलेली होती. नेहमीप्रमाणे त्या रात्री त्यांनी डुकरांना चारा दिला आणि घरी झोपायला गेले. मात्र सकाळी उठल्यावर नेहमी ऐकू येणारा डुकरांचा आवाज ऐवजी पूर्ण शांतता होती.
शेतकऱ्याने गोठ्याकडे जाऊन पाहिले, तेव्हा तो अक्षरशः हादरून गेला. एकही डुक्कर तिथे नव्हते. सर्व डुकरे गायब झाली होती. गावकऱ्यांनी मिळून परिसरात शोधाशोध केली. पण काहीही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी वेंकटपथी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी एक विशेष तपास पथक तयार केले. निरीक्षक नारायणस्वामी आणि उपनिरीक्षक जगदीश यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिस थेट आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे पोहोचले.
तेथे आरोपी आनंदाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आनंदाने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की या चोरीत त्याच्यासोबत आणखी चार जण होते. चोरी केलेली सर्व डुकरे त्याने आधीच विकून टाकली होती आणि त्यातून मिळालेले पैसे घरी लपवून ठेवले होते.
पोलिसांनी आनंदाच्या घरी छापा टाकला असता, तब्बल 3 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. सध्या पोलिस उर्वरित आरोपींचा आणि या डुक्कर चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध घेत आहेत. या अनोख्या चोरीच्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस तपास अजूनही सुरू आहे.
