समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेनंतर आणखी तीन गाड्यांना आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाने सांगितले की त्यांना कारमध्ये स्फोट झाल्याचा फोन आला.त्यानंतर अग्निशमन दलाचे पथ तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साधारण संध्याकाळी 6 वाजून ४५ मिनिटांनी स्फोट झाल्याची माहिती आहे.
advertisement
वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या
स्फोटामुळे जवळच्या पार्क केलेल्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटावेळी मोठी गर्दी होती. दोन ते तीन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कारमधील सीएनजीमुळे झाला की इतर काही कारणाने हे अद्याप कळलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लाल किल्ला परिसरात स्फोटाचा प्रकार अजून स्पष्ट झालेला नाही. DCP स्पेशल सेलसह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे. स्फोटाचे कारण आणि स्वरूप जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दिल्लीत हाय अलर्ट
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला असून त्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांनी तत्काळ प्रभावाने चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली असून, परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फॉरेन्सिक घटनास्थळी
लाल किल्ला परिसरात झालेल्या जोरदार स्फोटानंतर फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. हे तज्ज्ञ स्फोटाचा प्रकार आणि त्यामागील कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला असून, पोलिस आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत. प्राथमिक तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सकाळी फरिदाबादमध्ये २,९०० किलो अमोनियम नायट्रेट अन् संध्याकाळी ब्लास्ट
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ही घटना केवळ स्थानिक स्फोट नाही. दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये २,९०० किलो अमोनियम नायट्रेट सापडल्यानंतर काही दिवसांतच हा स्फोट झाला. तथापि, दोन्ही घटनांचा संबंध जोडणे अकाली ठरेल. अमोनियम नायट्रेट हे स्फोटके बनवण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे रसायन आहे. तपासात असे दिसून आले की अमोनियम नायट्रेट विविध सुटकेस आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केले होते. मात्र सध्या यावरून कोणताही निष्कर्ष लावता येणार नाही.
