Attack on Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी एका तरुणाने हल्ला केला. आरोपीने मुख्यमंत्री गुप्ता यांना चापट मारली, त्यांचे केस ओढून आणि त्यांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पोलीस आणि तक्रारदारांच्या उपस्थितीत घडले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जवळपास ८० सेकंद हल्ला करण्यात आला. तथापि, आरोपी हल्लेखोराला ताबडतोब पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.
advertisement
सकरिया राजेशभाई खिमजीभाई असं अटक केलेल्या आरोपीचं आहे. तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी असून त्याचे वय ४१ वर्षे आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी ८:१५ वाजता हल्ला करण्यात आला. आरोपी राजेशभाई खिमजीभाई याची कुंडली आता समोर आली आहे. तो गुजरातवरून दिल्लीला कसा आला, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिस तपासात राजेशभाई खिमजीभाई याच्याबद्दल नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपींविरुद्ध आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजेशभाई खिमजीभाई गुजरातमधील राजकोट येथील खोडल धाम येथे प्राणी कल्याणासाठी झालेल्या आंदोलनातही सहभागी होता. पण तो निषेध हिंसक नव्हता. त्यामुळे त्यावेळी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
स्वप्नात शिवलिंगावर कुत्रा दिसला अन् थेट मुख्यमंत्र्यांना केली मारहाण
पोलीस तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी खिमजीभाई हा मे महिन्यात अयोध्येला गेला होता. इथं त्याने माकडांच्या वेलफेअरसाठी उपोषण केलं होतं. मुख्यमंत्री रेखा गुप्तावरील हल्ल्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं की, त्याने स्वप्नात पाहिले होते की शिवलिंगावर एक कुत्रा बसला आहे, ज्यामुळे आरोपीला वाटले की शिवजींनी त्याला कुत्र्यांचा आवाज उठवण्यासाठी निवडलं आहे. आरोपीने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये दिल्लीत कुत्र्यांसाठी शेल्टर होम बांधत असल्याची माहिती होती. यामुळे मोकाट कुत्र्यांवर अन्याय होईल, याच भावनेतून त्याने मुख्यमंत्र्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय.
आरोपीनं दिलेल्या या अजब कारणामुळे आता चौकशी करणारे पोलीसही चक्रावले आहे. आरोपीनं नेमका हल्ला कशामुळे केला? याच्या खऱ्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. गुजरातमध्ये आरोपींविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत. यामुळे आरोपीने मुख्यमंत्र्यावर केलेल्या हल्ल्यामागे वेगळं कारण असावं, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.